अनंत चतुर्दशी दिंडोरी प्रणीत उत्सव (भाद्रपद शु.१४) दि. २३ सप्टेंबर

बर्‍याच ठिकाणी या दिवशी ‘गणपती विसर्जन’ हा उत्सव साजरा केला जातो. दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह, योग्य उत्तरपूजा करून विधिवत सागर, नदी, सरोवर वा शेतजमीन यात विसर्जित केले जाते. ‘पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा, आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करा’ अशी प्रार्थना केली जाते.

श्री गणेश पूजनाच्या दिवशी, सांगता पूजा म्हणून सत्यनारायण पूजन केले जाते तसेच याच दिवशी सायंकाळी ‘अनंत’ म्हणजे भगवान विष्णू यांचे सत्यनारायण पूजन करून पूजा केली जाते. स्वत:च्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडिण्यऋषींप्रमाणे आम्हाला दारिद्य्र, मनस्ताप, अपमान, निंदा, लाचारी येऊ नये, आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव, तुझ्या अस्तित्त्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे, आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे, अनंत विश्‍वाला सामावून घेणार्‍या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे, त्याच्याच हातात आपली दोरी आहे. हे भान असणे व त्यानुसार आपण कृती- विचार- आचार स्वभावावर अंकुश असणे व त्या परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान विष्णूंचे व त्यांचेच अवतार असलेल्या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत स्मरण, चिंतन, नामस्मरण चित्ती असू द्यावे हे सांगणारा हा उत्सव आहे. या दिवशी अनंत रुपात, अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णुंचे १००१ तुलसीपत्र वाहून पूजन केले जाते. तुळशीसारखे पावित्र्य, भक्ती, त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात, हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे, हेच हे व्रत सांगत असते. गतवैभव, गतमान, मन:शांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत आहे.

अधिक माहितीसाठी नजीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात संपर्क करावा.०२५५७-२२१७१०