भाद्रपद शुक्ल पंचमी ही ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते. ज्यांनी परमेश्वराच्या श्वासातून उत्पन्न झालेल्या वेदांचे प्रकटीकरण केले, जतन केले, त्याचा गूढार्थ सामान्य जनांपर्यंत पोहोचविण्याचे महत्कार्य केले त्या ऋषिमुनींचे ऋण व्यक्त करण्यासाठी ऋषिपंचमीचे व्रत केले जाते. या दिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपवास केला जातो. त्यांचे अंशत: अनुकरण करण्याच्या हेतूने या व्रतादिवशी विविध कंदमुळे, भक्षण करण्याचा संकेत आहे. पूर्वी ऋषिमुनी कोणत्याही पशूचे सहाय्य न घेता कंदमुळे, पिकवीत. त्यामुळे त्यांच्या अंगात कमालीचे पावित्र्य असे. देह, मन, बुध्दी, शील, आचरण, पवित्र असे. असाच आहार आपणसुध्दा त्या दिवशी करावा, असा संकेत आहे. म्हणजे नांगरट न केलेले धान्य, कंदमुळे खावीत.
सध्याच्या काळात ऋषिपंचमीचे व्रत करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण मानवाचे जीवनच दूषित होत चालले आहे. ऋषिपंचमीच्या दिवशी आघाड्याची किंवा अनिषिध्द वृक्षाच्या काडीने दात घासावेत. या व्रताचे स्नान नदी, विहीर, तलाव येथे शक्यतो करावे. शक्य नसल्यास घरीच स्नानापूर्वी
‘‘गंगा गंगोति यो ब्रूयाद् योजनानां शतैरी । मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकं स गच्छति ॥
या मंत्राने गंगेला आवाहन करावे. स्नानानंतर शुभ्र वस्त्र धारण करावे. कुंकुम तिलकधारण करावा. पंचगव्य प्राशन करतांना मंत्र म्हणावा,
यत्वमस्थिगतं पापं देहे तिष्ठति मामके । प्राशनात् पंचगव्यस्थ दहत्यग्निरिवेन्धनम् ॥
त्यानंतर एका पाटावर तांदळाचे नऊ ढीग करावेत. त्यावर ९ सुपार्या ठेवाव्या. पूजा पुर्वुख करावी. उजवीकडून पहिली सुपारी गणपती, शेवटची सुपारी अरूंधती मातेची व मधल्या सात अनुक्रमे कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ या सप्तर्षींच्या असतात. या सात ऋषिंचे आवाहन करून स्थापना करावी. नंतर षोडशोपचार पूजा करून अर्घ्य द्यावे. या दिवशी सुवासिनीस वायनदान करावे. हे व्रत विधवा, सुवासिनी दोघींनी करावे. हे व्रत पुरुषांनीही करण्यास हरकत नाही.