विजयादशमी (दसरा) (१८ ऑक्टोबर)

आश्‍विन शु. दशमीला दसरा हा सण साजरा करतात. या तिथीला “विजयादशमी” म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र ९ व्या दिवशी म्हणजे नवमीला उठवतात तर काही जण दसर्‍याला उठवतात. या दिवशी शमीची पूजा, सीमोल्लंघन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा ४ गोष्टी करायच्या असतात. दसरा हा चार मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही. हा दिवस सर्व कामांना शुभ मानतात.

माहिती व कथा:

दसरा हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो. तसे पाहिले तर हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. सुरूवातीला तो कृषी महोत्सव होता. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात, ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जात होता. आजही त्याच्या काही खुणा हा सण साजरा करतांना दिसतात. आजही घटा जवळ धान्याची पेरणी करणे, तयार झालेले धान्याचे तण देवास वाहणे. सीमोल्लंघनाला जातांना डोक्यावर धारण करणे ही प्रथा आहे. या सर्व गोष्टी कृषी महोत्सवाचेच महत्त्व सांगतात.

यापुढे सणाला धार्मिक रूप आले, पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला जाऊ लागला. या दिवशी शस्त्रांची पूजा करतात. दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणे आपल्याला याचा वेगळा अर्थही घेता येईल, आमच्या समाजात काही विचित्र रूढी आहेत धर्मभेद आहेत, जातीभेद आहेत, उच्चनीच हा भेदभाव आहे. अनेक लोक अत्यंत गरीब आहेत त्यांना पुरेसे धान्य वस्त्र मिळत नाही, राहायला घरेही नसतात, अशा वाईट सीमांनी आम्हाला वेढले आहे, आमचे सामाजिक जीवन गढूळ केले आहे, या सीमांचे उल्लंघन आम्हाला करावयाचे आहे. भेदभाव नष्ट करून बंधुभाव निर्माण करायचा आहे. सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे. त्यांची प्राप्ती करायची आहे. ‘सीमा ओलांडायची आहे’ म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे आहे. आम्ही हे केले तर दसरा साजरा केल्यासारखे होईल खरे सोने आमच्या हाती लागेल. दसर्‍याच्या दिवशी सोने लुटतात.