घटस्थापना/नवरात्र (आश्‍विन शु.१/२ ते आश्‍विन शु.९-दि. १० ते १८ ऑक्टो)

* शारदीय नवरात्र घटस्थापना विधी *

श्री स्वामी स्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ जप.

‘ॐ सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुऽते।

हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी-कुंकू स्वत:च्या कपाळी लावावे.

* खालील मंत्रांनी चार वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे.

१) ॐ ऐं आत्मतत्वं शोधयामी नम: स्वाहा।

२) ॐ र्‍हीं विद्यातत्वं शोधयामी नम: स्वाहा।

३) ॐ क्लीं शिवतत्वं शोधयामी नम: स्वाहा।

४) ॐ ऐं र्‍हीं क्लीं सर्वतत्वं शोधयामी नम: स्वाहा।

* गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा.

* संकल्प – ‘मी (अमुक) गोत्रात उत्पन्न (अमुक) नावाचा / नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्‍वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड- अचंचल-अभेद्य भक्ती, सेवा व सान्निध्यप्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीपप्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती (संस्कृत/प्राकृत) ग्रंथाचे (अमुक) संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे.’

* श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा पठण करावे.

* अखंड नवार्णव मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी.

१) घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावर लाल वस्त्र अंथरावे, चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी.

२) एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती, गहू मिसळून भरावी.

३) त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल लोकरीचे नऊ वेढे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात. विड्याची नऊ पाने व आंब्याचा डहाळा लावावा.

४) घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे, घटावर एका तांब्याच्या अथवा स्टिलच्या ताटलीत तांदुळ भरून ठेवावे.

५) खालील प्रमाणे कुलदेवीची पूजा करावी.

‘ॐ सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते। भयेभ्यस्त्राही नो देवी दूर्गेदेवी नमोऽस्तुते॥

म्हणून टाकास नमस्कार करावा.

* देवीच्या टाकावर 16/1 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा.

* घटावर विड्याची दोन पाने पुर्वेकडे देठ करून ठेवावी, त्यावर देवीचा टाक झोपवून ठेवावा.

* टाकाची पंचोपचार पूजा करावी.

* ध्यान :-

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम:। नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्मताम्॥

श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम:॥ ध्यायम् ध्यायामि। नमस्काराणि समर्पयामि॥

पंचोपचार पूजा –

1) श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती

त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम:। विलेपनार्थेचंदनम् समर्पयामि॥

अलंकारार्थेअक्षताम् समर्पयामि॥ हरिद्रां कुंकुम् सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि॥

(गंध लावावे, अक्षता वहाव्यात व हळद-कुंकू वहावे.)

2) श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती

त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम:। ऋतुकालोद्भव पुष्पम् समर्पयामि॥

(फुले वहावीत.)

3) श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती

त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम:। धूपम् आ-घ्रापयामि॥

(धूप ओवाळणे.)

4) श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती

त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम:। दीपं दर्शयामि॥

(दीप ओवाळणे.)

5) श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती

त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम:। नैवेद्य समर्पयामि॥

(कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.)

* पूजेनंतर 1 माळ घटावर खालील मंत्राने बांधावी.

‘ॐ मां माले महामाये सर्वशक्ति स्वरूपिणी।

चतूर्वर्ग त्वयी न्यस्तं स्तन्मान्मे सिद्धिदा भव॥

* पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी.

* आरती करावी.

* रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करून, घटास माळ चढवावी व आरती करावी.

* नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ श्री दुर्गा सप्तशती संस्कृत/ प्राकृत ग्रंथाचे करावे.

* कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा.

* अष्टमी, नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा. त्यांची प्रतिपदेला

केल्याप्रमाणे श्रीसूक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करावे. त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे. पुरणाच्या 21 दिव्यांनी महाआरती करावी.

* नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारीका व सवाष्ण भोजन करवावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा.

* दसर्‍याच्या दिवशी सीमोल्लंघनास जातांना घट, टोपली प्रवाहात विसर्जन

करावी. मातीवर आलेले धान्य, आपट्याच्या पानांसोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत. प्रसाद म्हणून स्त्रीयांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपीखाली किंवा कानावर धारण करावे.

* घटाची माती आपल्या शेतात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावी.