नोव्हेंबर-डिसेंबर महिना सण-वार-व्रत वैकल्ये यांची विस्तृत माहिती व पूजाविधी

 

मल्हारी मार्तंड षड्रात्री

घटस्थापना विधी

(मार्गशीर्ष शु. १ ते मार्गशीर्ष शु. ६)

(दि. २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१९)

श्री स्वामी स्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ जप

‘मुनीनां सप्त कोटीणां वरदं भक्त वत्सलां।
दुष्ट मर्दन देवेश वंदे हं म्हालसापती॥

  हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हळदी-कुंकू स्वत:च्या कपाळी लावावे. खालील मंत्रांनी चार वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे.

               १) ॐ ऐं आत्मतत्वं शोधयामी नम: स्वाहा।
              २) ॐ र्‍हीं विद्यातत्वं शोधयामी नम: स्वाहा।
              ३) ॐ क्लीं शिवतत्वं शोधयामी नम: स्वाहा।
              ४) ॐ ऐं र्‍हीं क्लीं सर्वतत्वं शोधयामी नम: स्वाहा।

गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा.
 संकल्प :

                ‘मी (अमुक) गोत्रात उत्पन्न (अमुक) नावाचा/नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड-अचंचल-अभेद्य भक्ती, सेवा व सान्निध्यप्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीपप्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे (अमुक) संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे.’

श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा पठण करावे.

‘ॐ श्री गंगा-म्हाळसासहीत मणिमल्हारये नम:’

या मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी.
१) घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे, चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी.
२) एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती, गहू मिसळून भरावी.
३) त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट पिवळ्या लोकरीचे सहा वेढे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात. विड्याची पाच पाने व आंब्याचा डहाळा लावावा.
४) घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते हळदीचे गंध लावावे, घटावर एका तांब्याच्या अथवा स्टिलच्या ताटलीत तांदुळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल काढून ठेवावे.
५) खालील प्रमाणे खंडोबाची पूजा करावी.

ध्यान :

ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरिनिभं म्हाळसा भूषिताङकम्।
श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुधगणै: सेव्यमानं कृतार्थे:॥
युक्तांघ्रिं दैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामम्।
नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृतं नित्येमोंकाररूपम्॥

म्हणून टाकास नमस्कार करावा. खंडोबाच्या टाकावर १ वेळा श्रीसूक्त व एक वेळा रुद्र अथवा शिवमहिम्न म्हणून अभिषेक करावा. घटावर विड्याची दोन पाने पुर्वेकडे देठ करून ठेवावी, त्यावर खंडोबाचा टाक झोपवून ठेवावा. टाकाची पंचोपचार पूजा करावी.

पंचोपचार पूजा :

१) ॐ श्री मार्तंड भैरवाय नम:।

विलेपनार्थे चंदनम् समर्पयामि॥ (गंध लावावे.) अलंकारार्थे अक्षताम् समर्पयामि॥

हरिद्रांकुंकुम् सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि॥ (गंध लावावे, अक्षता वहाव्यात व हळद-कुंकू वहावे.)

२) ॐ श्री मार्तंड भैरवाय नम:। ऋतुकालोद्भव पुष्पम् समर्पयामि॥ (फुले वहावीत.)

३) ॐ श्री मार्तंड भैरवाय नम:। धूपम् आघ्रापयामि॥ (धूप ओवाळावा)

४) ॐ श्री मार्तंड भैरवाय नम:। दीपं दर्शयामि। (दीप ओवाळावा.)

५) ॐ श्री मार्तंड भैरवाय नम:। पंचामृतात्मकं नैवेद्य समर्पयामि॥ (पंचामृत वाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.)

पूजेनंतर १ माळ घटावर खालील मंत्राने बांधावी.

‘ॐ मां माले महामाये सर्वशक्ति स्वरूपिणी। चतूर्वर्ग त्वयी न्यस्ते स्तन्मान्मे सिद्धिदा भव॥’

पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी. रोज घटावरील टाकाची दूरूनच पंचोपचार पूजा करून, टाकास हळद वाहावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी, आरती करावी. सहा दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून १४ किंवा २८ पाठ श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे करावे.

 

 

चंपाषष्ठी (स्कंदषष्ठी)

मार्गशीर्ष शु. ६ (दि. २ डिसेंबर २०१९)

चंपाषष्टीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे. परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून, तळी भरून महानैवेद्य त्यात बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करावी.

तळी भरणे

  कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी तळी भरतात. ताम्हणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारीवर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात याची कलशासह पूजा करतात. पाच मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर तीनवेळा कपाळ टेकवतात व ‘येळकोट मल्हार, सदानंदाचा येळकोट, म्हाळसाकान्त कडे पठार की जय’ असा जयजयकार करतात. तसेच काही प्रदेशात

सदानंदाचा येळकोट, येळकोट मल्हार येळकोट ।

हर हर महादेव । चिंतामण मोरया । भैरोबाचा चांदोबा ।

अगडबंब नगारा । सोन्याची जेजुरी । मोत्याचा तुरा ।

निळा घोडा । पायी तोडा । कमर करगोटा । बेंबी हिरा ।

गळ्यात कंठी । मोहनमाळा । डोईवर शेला । अंगावर शाल ।

सदा हिलाल । जेजुरी जाई । शिकार खेळी ।

म्हाळसासुंदरी । आरती करी । देवा ओवाळी।

नानापरी। देवाच्या शृंगारा । कोट लागो शिखरा ।

खंडेरायाचा खंडका । भंडाराचा भडका । बोल सदानंदाचा येळकोट ।

  असे म्हणतात. हे म्हणताना हातात दिवटी-बुधली असते. विवाहापूर्वीचा कुलधर्म असेल, तर भाऊबंदांनीही त्यांच्या दिवट्या आणावयाच्या असतात. नंतर वरीलप्रमाणे जयजयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या-बुुधल्या घेऊन थोडे जायचे असते (किमान ५ पावले). त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जयजयकार करून घरी यायचे आणि नंतर नैवेद्य, पुराणाच्या १४ दिव्यानी आरती करावी, जमल्यास धनगर जोडप्यास जेऊ घालावे. षष्टीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी, जमलेली हळद पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यास ठेवावी.

 

 

श्रीदत्त जयंती सप्ताह

(मार्गशीर्ष शु. ९ ते मार्गशीर्ष शु.१५ )

दि. ५ डिसेंबर २०१९ ते १२ डिसेंबर २०१९

या दिवशी सर्वत्र दत्तजयंती उत्सव केला जातो. श्री दत्त महाराज हेच आपल्या मार्गाचे मूळ असल्याने हा कार्यक्रम सामुदायिकपणे व खूप भक्तिभावाने करावयाचा असतो. श्रीदत्तजयंती-निमित्त सर्व सेवेकर्‍यांनी उपोषण करावयाचे असते व उपवास, दुसर्‍या दिवशी प्रतिपदेला १०.३० च्या आरतीनंतर सोडावयाचा हे प्रथम लक्षात ठेवावे.

  या दिवशी केंद्रात नैवेद्य आरती १०.३० वाजता न करता १२.३९ नंतर करतात. साधारण सर्व फोटोंची पूजा करून, हार घालून ठिक १२.१५ वाजेपर्यंत गुरुचरित्रातील ४ था अध्याय एका सेवेकर्‍याने सावकाश वाचावा व इतरांनी श्रवण करावा. बरोबर १२.३९ ला अध्यायातील वाचनातील (त्यातील “तीन बाळे झाली”, या ओळीनंतर वाचन बंद करावे).

  त्यावेळी अवधूत चिंतन ‘श्री गुरुदेव दत्त’ असा तीनवेळा मोठ्याने जयजयकार करून आरती करावी. या दिवशी नैवेद्यात अन्नाचा नैवेद्य न करता फराळाचा उपवासाचा नैवेद्य करावा. सकाळच्या ३  व सायंकाळच्या २  आरत्या कराव्यात. दुसर्‍या दिवशी सकाळची ८ ची आरती झाल्यानंतर १०.३० पूर्वी श्रीसत्यदत्तपूजा करून सर्वांनी ११ माळ जप करावा. अन्नाचे ६ नैवेद्य दाखवून १०.३० ची आरती करून प्रसाद वाटावा.

 

श्री दत्तजयंती अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह वेळापत्रक

दि. ५ डिसेंबर २०१९ ते १२ डिसेंबर २०१९

दि. ४ डिसेंबर २०१९, बुधवार

ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी,

दि. ५ डिसेंबर २०१९, गुरुवार

मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, नित्यस्वाहाकार

दि. ६ डिसेंबर २०१९, शुक्रवार

नित्यस्वाहाकार, गणेश याग

दि. ७ डिसेंबर २०१९, शनिवार

नित्य स्वाहाकार, स्वामी याग

दि. ८ डिसेंबर २०१९, रविवार

नित्य स्वाहाकार, गिताई याग

दि. ९  डिसेंबर २०१९, सोमवार

नित्य स्वाहाकार, चंडी याग

दि. १० डिसेंबर २०१९, मंगळवार

नित्य स्वाहाकार, रुद्र याग

दि. ११ डिसेंबर २०१९, बुधवार

नित्य स्वाहाकार, बली पूर्णाहुती,

दुपारी १२.३९ वा. श्रीदत्त जन्मोत्सव

दि.१२ डिसेंबर २०१९, गुरुवार

श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन

अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह सांगता

सप्ताह कालावधीतील रोजचा दिनक्रम

* सकाळी ७.३० वा. :-  औदुंबर प्रदक्षिणा

* सकाळी ०८.०० वा. :- भूपाळी आरती

* सकाळी ०८.३० ते १०.३० वा. :-  माईकवरून सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन, त्याचवेळी यज्ञमंडपात प्रातिनिधीक स्वरूपात सेवेकर्‍याकडून नित्यस्वाहाकार

* सकाळी १०.३० वा. :-  नैवेद्य आरती (सकाळच्या तीन आरत्या, मंत्रपुष्पांजली व प्रार्थना)

* सकाळी १०.३० ते १२.३०:- विशेषयाग

* दुपारी १२.३० ते २.०० वा. :-  भोजन आणि विश्रांती
* दुपारी २.०० ते ६.०० वा. :-  श्री स्वामी चरित्र सारामृत व श्री दुर्गा सप्तशती (प्राकृत) वाचन,१ आवर्तन रुद्राध्याय, ग्रामअभियान अंतर्गत १८ विभागाचे मार्गदर्शन व सांस्कृतीक कार्यक्रम

* संध्या ६.०० ते ६.३०वा.:-  औदुंबर प्रदक्षिणा
* संध्या ६.३० वा.:-  नैवेद्य आरती (संध्याकाळच्या सर्व आरत्या मंत्रपुष्पांजलीसह)
* संध्या ६.५० वा.:-  नित्यध्यान, गीतेचा १५ वा अध्याय श्री विष्णूसहस्त्रनाम वाचन, श्री स्वामी समर्थ मंत्र जप एक माळ, त्यानंतर ऐच्छिक श्री स्वामीचरित्र किंवा श्री दुर्गासप्तशती सामुदायिक वाचन करावे.
* महत्वाची सूचना *
श्री गुरुचरित्र पारायण करू इच्छिणार्‍या सेवेकर्‍यांनी सप्ताहापूर्वी १५ दिवस अगोदर आपली नाव नोंदणी सेवाकेंद्रात करावी जेणेकरून नियोजन करणे सोपे जाईल, तसेच ऐनवेळी नाव नोंदणी करून होणारी गैरसोय टाळता येईल.