बालसंस्कारचा विभागाचा आगळावेगळा विश्वविक्रमी स्तोत्र-मंत्र पठण व वृक्षारोपणाचा विक्रम
नाशिक- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व त्र्यंबकेश्वर गुरुपीठाच्या वतीने एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित करण्यात आला असून या विक्रमाची नोंद इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेतली आहे. या उपक्रमा अंतर्गत एकाच दिवशी ठराविक वेळेत लाखो विद्यार्थ्यांनी स्तोत्र मंत्र पठण व वृक्षारोपण केले. एकाच दिवसात महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सव्वा लक्ष पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली.
देशभरातील अनेक राज्यांसह परदेशातही काही ठिकाणी संपन्न झालेल्या या अभियानाबाबत माहिती देताना या अभियानाचे समन्वयक नितीनभाऊ मोरे म्हणाले, “एकाग्रता, स्मरणशक्तीत वृद्धी करणारे, मानसिक विकास घडवून आणणारे अनेक स्तोत्र-मंत्र आपल्या पूर्वजांनी-पूर्वाचार्यांनी आपणास उपलब्ध करून दिले आहेत. गणेश गायत्री, श्री स्वामी समर्थ, गायत्री, नवार्णव, सूर्य, महामृत्युंजय, सरस्वती मंत्र, गणपती, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सेवामार्गाच्या बालसंस्कार केंद्रांमधून विद्यार्थ्यांकडून रोज पठण करून घेतले जातात. या सर्व स्तोत्र-मंत्रांचे एकाच वेळी अनेक ठिकाणी पठण करून घेण्याचा विचार पुढे आला., तेव्हा त्यास जोडून वृक्षारोपण करावे व त्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर द्यावी असेही ठरले.”
या अभियानास अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद लाभला असे सांगून नितीनभाऊ मोरे यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, “अमेरिका, दुबई, नेपाळ मधील काही केंद्रांबरोबरच जम्मू, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा, छत्तीसगढ, हैद्राबाद, कर्नाटक, केरळ चेन्नईसह महाराष्ट्रात सर्वच समर्थ सेवा केंद्र आणि शाळांमध्ये एकाच वेळी २ लाख विद्यार्थ्यांनी स्तोत्र-मंत्र पठण व वृक्षारोपण अभियानात सहभाग नोंदविला. २१ जुलै २०१९ रोजी सकाळी १०:४५ ते ११:४५ या वेळेत स्तोत्र-मंत्र पठणाचा कार्यक्रम झाला तर दुपारच्या सत्रात वृक्षारोपण करण्यात आले. आतापर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार सव्वा लक्ष पेक्षा ज्यादा वृक्षांची लागवड झाली आहे, ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे.”
या विक्रमी अभियानाची तयारी व सुनियोजन गेल्या अनेक दिवसांपासून नितीनभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली १५०० पेक्षा अधिक सेवेकरी करत होते. अभियानासाठी फ्लेक्स, पत्रके, फॉर्म, नोंदणी, चहा, नाश्ता, बैठक व्यवस्था, रोपांची उपलब्धता, जेवण, वृक्षारोपणासाठी खड्डे खोदणे, फोटो, व्हिडीओ शूटिंग, पठणाचा सराव, साऊंड सिस्टीम अशी छोटी मोठी तयारी गेले अनेक दिवस सुरु होती.
गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांचे मार्गदर्शनाखाली देशभर विविध समाज व राष्ट्रोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. हे अभियान सुद्धा गुरुमाऊलींच्या प्रेरणेतून यशस्वी झाले असे नितीनभाऊ मोरे यांनी आवर्जून स्पष्ट केले.