विश्वविक्रमी युवा महोत्सव अंतर्गत मानवी साखळीद्वारे व्यसनमुक्ती जनजागृती अभियान संपन्न!

दिनांक १८ ऑगस्ट रोजी वेरूळ येथे उभारली विश्वविक्रमी मानवी साखळी,उपक्रमातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश !

           अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक सेवा मार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या मार्फत परमपूज्य गुरूमाऊलींच्या आशीर्वादाने युवा प्रबोधन हे अभियान आदरणीय नितीनभाऊंच्या मार्गदर्शनाने देशस्तरावर सुरू आहे.

          या अंतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी युवा शिबिर घेण्यात आले. यात युवकांच्या समस्या, करियर गाईडंस, व्यवसाय प्रशिक्षण- मार्गदर्शन, आरोग्य आहार, आपत्ती व्यवस्थापन योगदान, दुर्गसंवर्धन, पर्यावरण पूरक उपक्रमांमध्ये सहभाग, व्यसनमुक्ती अभियान, ताण- तणाव व्यवस्थापन, अध्यात्म आणि विज्ञान, डोळस अध्यात्माची ओळख, भारतीय संस्कृती व सणांचे वैज्ञानिक विवेचन, मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी मर्यादित वापर याप्रकारे युवा प्रबोधन उपक्रम सर्वदूर राबविले जात आहेत.

         या अभियानांतर्गत युवा महोत्सव व व्यसनमुक्तीचा संदेश देणारी विश्वविक्रमी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.  सेवामार्गाद्वारे नेहमीच युवकांना निर्व्यसनी, निरोगी आणि आदर्श जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. सेवामार्गाचा युवा प्रबोधन विभाग २०१९ हे वर्ष ‘युवा प्रबोधन वर्ष’ म्हणून साजरे करत आहे, त्या अंतर्गत सुरू विविध उपक्रमां अंतर्गत या भव्य युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

               युवा प्रबोधन विभागाच्या माध्यमातून समाजासाठी सुजाण, निर्व्यसनी व कर्तव्यदक्ष युवा पिढी निर्माण करण्यासाठी या विभागाचे प्रमुख मार्गदर्शक गुरुपुत्र आदरणीय श्री नितिन भाऊ मोरे यांचे युवकांसाठी प्रबोधनपर हितगुज संपन्न झाले. व्यसनाधीनता या गंभीर समस्येवर प्रभावी प्रबोधन व परिणामकारक उपाय यावर सखोल माहिती या युवा महोत्सवाच्या माध्यमातून देण्यात आली.

             श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग परिसरातील श्री संत जनार्दन स्वामी हॉल येथे संपन्न झालेल्या या उपक्रमातून विश्वविक्रमी काही किलोमीटर लांब मानवी साखळी बनवण्यात आली ज्यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी, युवकांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

              व्यसनाधीनता या गंभीर समस्येवर सेवा कार्याद्वारे करण्यात येणारे प्रबोधन व उपाय याची देखील माहिती यावेळी देण्यात आली.

          या उपक्रमात जवळपास १०,००० नागरिक उपस्थित होते ज्यामध्ये युवक-युवतींची संख्या लक्षणीय होती तसेच या ऐतिहासिक युवा महोत्सवाची सांगता व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.