
भारतात अनेक अध्यात्म मार्ग, पंथ, संप्रदाय आहेत. त्यामध्ये प्रवचनाद्वारा मोक्षाचीच प्रेरणा दिली जाते. पण सध्याच्या काळात ही प्रवचने सर्वसामान्य माणसाला आचरणास कठीण वाटतात. जोपर्यंत मानवाच्या शारीरिक, आर्थिक, मानसिक समस्या सुटत नाहीत तोपर्यंत मानव निरपेक्ष मोक्षाची इच्छा व प्रयत्नही करू शकत नाही. त्यातच अनेक अध्यात्मिक धार्मिक मार्गात बुवाबाजी, फसवेगिरी चालू असल्यामुळे माणसाची मूळ अध्यात्म मार्गावरील श्रद्धाच ढासळू लागली आहे. अशा परिस्थितीत “दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्ग” हा सुलभ, विनामुल्य मार्गदर्शनाचा असल्यामुळे समाजाला संजीवनी स्वरूप ठरेल. हा मार्ग प्रथम मानवी जीवाची सर्व प्रकारच्या कौटुंबिक समस्यांतून आध्यात्मिक सेवेद्वारे मुक्तता करतो आणि तो जीव पुढे कायम मानसिक शांतता लाभावी या हेतूने अध्यात्मिक सेवा स्वयंप्रेरणेने सुरूच ठेवतो. यामुळे सर्व कुटुंबच या सेवामार्गात वाटचाल करून सुसंस्कारित होऊन भयमुक्त होते. त्यामुळे पुढील पिढी सुसंस्कारित, आत्मविश्वासू, कर्तबगार, निर्भय अशी घडविली जाते.
या गुरुप्रणीत मार्गाचे मूळ “भगवान दत्तात्रेय” असून श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रम्हीभूत पिठले महाराज, सदगुरू प.पू. मोरेदादा अशी गुरु परंपरा आहे..
भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेकविध अवतार धारण केले.त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेवून अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इ.स. ११४९ मध्ये छेली खेडे पंजाबमधून प्रगट होवून भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळावेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. २२९ वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हेअखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इ.स. १३७८ मध्ये पिठापूर (आंध्रप्रदेश) येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे १५० वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इ.स.१५२८ मध्ये कारंजा (विदर्भ-महाराष्ट्र) येथून श्री नृसिंहसरस्वती या अवतारात सुमारे १०० वर्षे कार्ये केले. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७८ मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इ.स. १८५६ मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे २२ वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दु:ख मुक्त करून स्वयंभू बनविले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. पूर्व संचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करत असतांना कुठेही वाऱ्या किंवा खेट्या घालावयास लावल्या नाहीत. कुठेही प्रचार अथवा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार याविषयीचे मूळ विचार मांडले. इ.स. १८७८ मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिक दृष्ट्या देह संपविला. परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने “दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक मार्गातून” सुरु आहे. हा मार्ग गुरुप्रणीत मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने, अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवितो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतीमय बनवितात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती असून “श्री स्वामी समर्थ” हा एक शक्तिमान मंत्र आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तेजाची उपासना केलेल्या ब्रम्हीभूत पिठले महाराजांचे गुरुपद नृसिंहवाडी येथील संगमावर स्वत: श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी घेतले. श्री स्वामी समर्थ महाराजंच्या आशीर्वादाने त्यांनी आध्यात्मिक सेवेद्वारे दु:खी,पीडितांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरु केले. व्यवहार व अध्यात्म यांची सुरेख संगती लावून तळागाळातील माणसांपर्यंत सर्व कार्य न्यावयाचे होते. लोकांमधील अंधश्रद्धा दूर करून डोळस श्रद्धा वाढीस लावायची होती. याच दरम्यान स्वामी महाराजांनी सुचविल्याप्रमाणे त्यांनी एक शिष्य तयार केला, तेच सद्गुरू प. पू. मोरेदादा होय. मुळचे शेतकरी असलेल्या दादांनी ४० वर्षे अविश्रांत कार्य करून या मानवता धर्माच्या वेदीवर बलिदान केले व हजारो सेवेकऱ्यांना स्वयंपूर्ण करून सोडले आहे.

सद्गुरू प.पू. मोरेदादांनी पूर्ण आयुष्याचा प्रत्येक क्षण परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ तत्व सर्वसामान्यांना कोणताच भेदभाव न करता अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात व्यतीत केला आहे. सद्गुरू प.पू.दादांनी १९७८ पर्यंत छत्रपती शिवरायांप्रमाणे निष्ठावान माणसे घडविली व परमात्म्याचे कार्य करण्याची योजना राबविली. १९७८ पासून पुढे महाराजांच्या आशीर्वादाने या गुरुप्रणीत मार्गासाठी वेगवान घोडदौड करून मानवी आवाक्याबाहेरचे कार्य उभे केले. सद्गुरू प.पू. मोरेदादा यांनी सेवामार्गात कुणाचेही गुरुपद न घेता थेट “श्री स्वामी समर्थ” महाराजांनाच गुरु करण्याची प्रथा रूढ केली. ही दादांच्या नीरअहंकाराची परमोच्च साक्ष आहे. सेवामार्गात मार्गदर्शन विनामुल्य ठेवल्यामुळे व संबधित वाङमयही माफक दरात ठेवल्यामुळे तळागाळातील लोकही सेवामार्गाचा लाभ मिळवू लागले. सर्व साहित्य व ज्ञानाच्या बाबतीत कोणतीही गोपनीयता न ठेवता पुढील पिढीसाठी सहज उपलब्ध करून ठेवल्यामुळे मार्गाच्या वाढत्या प्रचारासाठी त्यांच्या महानिर्वाणानंतरही अनेक सेवेकरी या कार्यासाठी क्रियाशील होवू लागले.
तथाकथित धर्ममार्तंडांनी महिला वर्गास हजारो वर्षे अध्यात्मिक ग्रंथ व ज्ञानपासून वंचित ठेवले. त्या महिलांनाच सद्गुरू मोरेदादांनी प्रचार-प्रसाराचे आधारस्तंभ बनविले. “श्रीगुरुचरित्रा” सारख्या वेद्तुल्य ग्रंथाचे पारायणे करण्यास महिलांना असलेली बंदी दादांनी दूर केली.

सद्गुरू मोरेदादांच्या महानिर्वाणानंतर लाखो सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान गुरुमाऊली प. पू. आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा विजय ध्वज सतत उंचवत ठेवलेला आहे. समाजातील विविध समस्यांचा बारकाईने अभ्यास करून प. पू. गुरुमाऊलींनी “सेवेकऱ्यांचे ग्रामअभियान” सुरु केले.
या ग्रामअभियानात समाजातील प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी १६ सूत्री विविध विभागांची निर्मिती केली ती याप्रमाणे…
१२) पर्यावरण प्रकृती विभाग १३) पशु-गौवंश विभाग १४) माहिती व तंत्रज्ञान विभाग १५) प्रशासकीय विभाग १६) देश विदेश अभियान विभाग
या १६ सूत्री ग्रामअभियानाद्वारे मानव घडविणे, सन्मार्गाला लावणे आणि राष्ट्राचा विकास साधने याप्रमाणे कार्य सुरु आहे. “मानव ही एकच जात व मानवता हा एकच धर्म” अशी शिकवण या सेवामार्गातून प.पू. गुरुमाऊली कोट्यावधी सेवेकऱ्यांना देत आहे. अध्यात्म व विज्ञानाची अनोखी सांगड घालून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे व प्राचीन शास्त्रांचा, ग्रंथांचा अभ्यास करून नवनवीन संशोधन करण्याचे काम या विभागांद्वारे सुरु आहे. कोणतीही समस्या / प्रश्न असो त्यावर संबंधित विभागातून विनामुल्य मार्गदर्शन मिळते.
उदा. शेतीच्या समस्यांबाबत कृषीशास्त्र विभागातून विनामुल्य मार्गदर्शन व प्रशिक्षणही मिळते; विवाह संस्कार विभागाद्वारे विवाहपूर्व व विवाहोत्तर समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते इत्यादी.
शेतकऱ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान देणे गरजेचे आहे आणि एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला आपला अनुभव सांगितल्यास तो लवकर पटतो म्हणूनच गुरुमाऊलींनी शेतामध्येच शेतकऱ्यांना एकत्र करून नैसर्गिक व सेंद्रिय विविध प्रयोग करून दाखविले. रासायनीक शेतीपेक्षा नैसर्गिक व सेंद्रिय शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाची “गुणवत्ता आणि सात्विकता” कशी चांगली असते हे शेतकऱ्यांना स्वत: सेंद्रिय शेती करून दाखविले आहे. दिंडोरी येथे स्वत: गुरुमाऊली यांनी आध्यात्मिक शेती हा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. पिकांना, गायींना विविध वेदोक्त मंत्र, ऋचा विविध शास्त्रीय संगीतातील राग, मंदिरातील अभिषेकाचे तीर्थ, शेतीमध्ये केलेल्या अग्निहोत्राची रक्षा अशा नानाविध बाबींचा शेतीतील उत्पदनावर होणारा चांगला परीणाम हे प्रत्यक्ष कृतीतून घडवून सांगितला आहे. आजही दिंडोरी येथे भेट देऊन आपण ही आध्यात्मिक व सात्विक शेती आपण पाहू शकता. “उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी” हे शाश्वत सूत्र आहे. परंतु सध्याच्या काळात हा क्रम थोडा बदलला आहे, यामध्ये शेती मागे पडली आहे. म्हणूनच आजच्या सुशिक्षित युवापिढीने पुन्हा हे सूत्र दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. असा गुरुमाऊलींचा आजच्या तरुणवर्गास संदेश आहे.
आचारसंहिता
- श्री स्वामी समर्थ महाराजांना भूषणावह होईल असे वागावे.
- श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहावे.
- सबसे बडा गुरु, गुरुसे बडा गुरुका ध्यास.
- परस्रीयांना आपल्या माता – भगिनींसमान मान द्यावा.
- रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे ३ अध्याय क्रमशः वाचावेत व ११ माळी ||श्री स्वामी समर्थ|| या मंत्राचा जप करावा.
- आपण जे जे जेवू, खाऊ ते ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे.
- प्रात:काली उठतांना, रात्री झोपतांना व एरवीदेखील महाराजांचे स्मरण करावे.
- श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करावी.
- आपले आचारविचार धर्मसंस्कृतीप्रमाणे असावेत. मद्य-मांस वर्ज्य.
- माता-पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे.
- सद्गुरूप्रणित मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे.
- कुलदेवतेचे रोज स्मरण/नमन करावे. कुलाचार पाळावेत.
- रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करावा.
- श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जातांना हार, फुले, उदबत्ती, श्रीफल व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे.
- उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी. अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे. काम्य सेवा संकल्पपूर्वक असावी.
- भगवान श्री स्वामी समार्थांवरील अपर सेवेने, भक्तीने, श्रद्धेने, दु:ख समूळ नष्ट होते,व त्यांचेच सेवेने व अध्यात्माचा मोठा व अवघड मार्ग सोपा होतो.
- अध्यात्म हे साक्षी पुराव्याने सिद्ध करावयाचे नसून अंतरंगातील अनुभूतीने जाणवायची बाब आहे.
- संसारात ईश्वराचे अधिष्ठान असेल तर तो शांतीमय, सुखकर असतो, अधिष्ठान नसेल तर तो दु:खमय, कष्टमय होतो.
- सेवेकरी किती श्रेष्ठ आहे, त्याने उपासना किती मोठी केली याला महत्व नसून त्याचे आचरण, अंतकरण चारित्र्य किती शुध्द आहे याला अतिशय महत्व आहे.
- आपल्याला दुसऱ्याचे चांगले करता आले नाही तर वाईट करू नये, दुसऱ्याचे भले व्हावे ही सदिच्छा नित्य बाळगावी. चिंती परा ते येई घरा.
- दु:खी माणसाला हिंमत, धैर्य, दिलासा देऊन त्याचे मुखावरील हरवलेले स्मीत पुन्हा निर्माण करणे ही आर्ततेने केलेली परब्रम्हाची आरती होय.
- केवळ मांसाहार म्हणजेच हिंसा नसून अकारण कुजके बोलून कोपरखळी मारून दुसऱ्याचे मन दुखविणे ही तर फार मोठी हिंसा व अत्याचार आहे.
- नुसती चर्चा करणे वैफल्य आहे. प्रत्यक्ष कार्य होणे अतिशय महत्वाचे.
- सदगुरूंचे काम करावयाचे हा आपल्या पुढील प्रश्न नसून सदगुरुंसाठी ध्यास धरावयाचा हाच सर्वांचा हेतू आहे.
- श्रद्धेनेच कर्म फलप्रद होते. संशयी, शंखेखोर मन हेच पाप आहे.
- जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरु होते.
- जो धर्माचे पालन करतो त्याचे धर्मच रक्षण करतो.
- जो सेवेकरी श्रेष्ठ सेवा करूनही शेवटी राहण्याचा प्रयत्न करतो त्याला परलोकी प्रथम क्रमांकाचे स्थान मिळते.
- ज्ञान ही शिकण्याची किंवा शिकविण्याची वस्तू नव्हे तर ती जाणण्याची आहे. म्हणजेच गुरुकृपा आहे.
- कुसंगती, व्यसने, कृत्रिमता, नाटकी वागणे सोडा साधी माणुसकी जोडा.
- प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरातील देव्हाऱ्यात कुलदेवता व कुलदैवत यांची स्थापना करावी व वर्षातून एकदा त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन योग्य तो मानसन्मान करावा.
- प्रत्येक सेवेकऱ्याने स्वत:च्या मुलांचे वाढदिवस इंग्रजी तारखेनुसार न करता पंचांगातील तिथीनुसार व दिंडोरी प्रणीत मार्गानुसार करावेत.
- मुलांना रोज सरस्वती मंत्र, गणपती अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र, रामरक्षा, मनाचे श्लोक, विष्णूसहस्त्रनाम शिकवून नित्यनियमाने पठण करून घ्यावे.
- सेवेकऱ्याने आपल्या दरमहा मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी अर्पण करावा व तो नियमितपणे आपल्या आपल्या केंद्रात जमा करावा.
- सेवेकऱ्याने केंद्रातील ११ उत्सवात तन ,मन, धनासह सक्रीय सहभागी व्हावे .
- सेवेकऱ्याने दिवसातून किमान एका आरतीला आपल्या नजीकच्या सेवाकेंद्रात उपस्थित राहावे .
- सेवेकऱ्याने दरवर्षी गुरुपौर्णिमेला परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची यथासांग पूजा करून त्यांना आपले गुरुपद घेण्याची विनंती करावी .
- स्त्रियांनी केस कापू नये .स्त्रियानी हळदी ,कुंकू लावावे. स्त्रियानी अंगावर सौभाग्य अलंकार नेहमी धारण करावेत. स्त्रियांनी व मुलींनी हातात काचेच्या बांगडया घालाव्यात.
- प्रत्येकाने प्रधान सेवाकेंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी व श्रीगुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथील संपर्कात राहावे.
- येथून मिळणाऱ्या विविध सूचना व आदेशांचे काटेकोरपणे पालन करून आपली सेवा रुजू करावी .
- श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहें” या वचनाची नेहमी जाण ठेवावी .
|| श्री स्वामी समर्थ गुरुमाउली चरर्णापणमस्तु ||