स्वामी सेवा प्रकाशन

दिंडोरी प्रणित सेवामार्गातून विविध धर्मग्रंथ व वेदांचा अभ्यास करून त्यातील तत्वज्ञान, विज्ञान व अध्यात्म यांचा सारांश सर्वसामान्यांना कळेल इतक्या सहज सोप्या भाषेत विविध ग्रंथ, मासिके, त्रैमासिके, पुस्तके यांच्या रूपाने प्रकाशित करण्यात येतो. सेवामार्गाची प्रकाशनमाला आजवर ८० पेक्षाही अधिक ग्रंथांपर्यंत पोहचली आहे. कोणताही ग्रंथ प्रकाशित करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास केला जातो. विविध संदर्भ तपासले जातात. स्तोत्र-मंत्राच्या बाबतीत त्यांची लिखाण व उच्चार शुद्धता प्रामुख्याने जपली जाते. त्यानंतर त्यांची विचारपूर्वक मांडणी करूनच प्रकाशन विभागात टायपिंग, प्रुफ रिडिंग व डिझाईन करून छापले जातात. या ग्रंथांद्वारे कोणताही नफा कमविण्याचा हेतू नसल्याने यांचे देणगीमूल्यही अगदी माफक असते. भाविक व सेवेकऱ्यांना अध्यात्मिक सेवेबरोबरच आपल्या देशातील आजवर ऋषीमुनींनी केलेल्या संशोधनाचा लाभ मिळावा आणि त्यांचे ज्ञान वृद्धिंगत होऊन सेवा-उपासना वाढावी हाच या प्रकाशना मागील प्रांजळ उद्देश… सेवामार्गातील प्रकाशन साहित्य हे मराठी, हिंदी, कन्नड, गुजराथी, तेलगु, तमिळव इंग्रजी इत्यादी भाषांसह अंधलीपी म्हणजेच ब्रेल लिपीतही उपलब्ध आहेत.

“श्री स्वामी समर्थ मार्गदर्शिका”: म्हणजेच कॅलेंडर भारतभरात पोहचले असून. गेल्या ४ वर्षांपासून परदेशातही तिथल्या प्रमाण वेळेनुसार तयार केलेल्या “श्री स्वामी समर्थ मार्गदर्शिका” पोहचल्या आहेत. मार्गदर्शिकेच्या प्रत्येक पानाच्या मागील बाजूस असलेला दुर्मिळ ज्ञानाचा संग्रह हा खास लोकांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहे.

श्री स्वामी सेवा मासिक व त्रैमासिक: प.पू.गुरुमाऊलींचे हितगुज, आयुर्वेद, सण- वार-व्रत- वैकल्ये, तीर्थाटन, वेद-विज्ञान संशोधन, बालसंस्कार, कृषीशास्त्र, विविध विषयांवरील उपयुक्त माहितीचे संकलन, ज्योतिषशास्त्र इत्यादी विविध प्रकारच्या ज्ञानाने समृद्ध असलेल्या स्वामी सेवा मासिक व त्रैमासिकांचे २ लाखांपेक्षाही अधिक वार्षिक सभासद आहेत.